नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्या घरात शिरून चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील रोकडसह लॅपटॉप व एटीएमकार्ड असा ४० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. महिला आपल्या बहिणीच्या घरी आलेली असतांना ही चोरी झाली. या घटनेत एटीएम कार्डचा गैरवापर करून भामट्यांनी परस्पर नऊ हजार रूपये काढून घेतले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शितल विठ्ठल दिवटे (३३) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दिवटे या गुरूवारी (दि.८) सकाळी बहिण माया किरण वाघ (रा.चंद्रगंगा अपा.आरटीओ कॉर्नर गोरक्षनगर) यांच्या घरी अल्पावधीसाठी आल्या होत्या. दोघी बहिणी स्वयंपाक घरात गप्पा मारत बसल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने उघड्या घरात शिरून हॉलमध्ये दिवटे यांनी ठेवलेल्या बॅगेतील लॅपटॉप, एक हजाराची रोकड महत्वाची कागदपत्र आणि एचडीएफसी बँकेचे एटीएम कार्ड असा सुमारे ४० हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.
भामट्यानी एटीएम कार्डचा गैरवापर करून परस्पर नऊ हजाराची रोकड काढून घेतल्याने हा प्रकार समोर आला असून अधिक तपास हवालदार खराटे करीत आहेत.
मोबाईलसह फॅब्रीकेशनचे साहित्य चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी मोबाईलसह फॅब्रीकेशनचे साहित्य चोरून नेले. त्यात वेल्डींग मशिन,टाईल्स वुडन,स्टील कटर तसेच छोटे मोठे ड्रील मशिनचा समावेश आहे. ही घटना दिपाली नगर भागात घडली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन भिकूभाई वाला (रा.शक्तीनगर हिरावाडीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. नितीन वाला यांचे सयाजी पॅलेस हॉटेल परिसरातील स्नेह वंदन बिल्डींग येथे फॅब्रीकशेनचे काम सुरू आहे. गेल्या सोमवारी (दि.३) रात्री ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी बिल्डींगच्या गेटचा कडीकोयंडा व कुलूप तोडून बंग धरात ठेवलेले दोन मबाईल व साहित्य असा सुमारे ५० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.