नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंगावर दुचाकी घालत एकाने भररस्त्यात तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार मोठा वडाळानाका भागात घडला. गेल्या काही महिन्यांपासून दुचाकीस्वार युवतीचा पाठलाग करून मानसिक त्रास देत होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू सोनवणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकाच भागातील रहिवासी असून गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून संशयित तिस त्रास देत आहे. गुरूवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास ती आपल्या घरासमोर बहिणीच्या मुलास खेळवत असतांना ही घटना घडली.
पाठीमागून आलेल्या संशयिताने तिच्या अंगावर दुचाकी घातली. यावेळी युवतीने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने तुझा कुठे जीव गेला असे म्हणत तरूणीचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक सय्यद करीत आहेत.