नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नव्याने सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकाम साईटवरून चोरट्यांनी नळ खोलून नेले. ही घटना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरातील श्रीरामनगर भागात घडली असून यात सुमारे ४० हजार रूपये किमतीचे नळ चोरट्यानी पळविले आहेत. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदिपकमार प्रल्हादराव दाबेराव (६७ रा.रथचक्र चौक, इंदिरानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दाबेराव यांची श्रीरामनगर येथील सर्व्हे नं. ८६८ या भूखंडावर नवीन बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी (दि.३) रात्री अज्ञात चोरट्यांनी बांधकाम सुरू असलेल्या बंगल्याचे दार तोडून ही चोरी केली. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यानी फिटींग केलेले जग्वार कंपनीचे बारा नळ खोलून नेले. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.
तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. सिन्नरफाटा भागात ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर कैलास डोगले (२४ रा. म्हाडा बिल्डीग पीजी ४ सामनगावरोड,ना.रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. डोगले याच्या वाढत्या गुन्हेगारीस पायबंद घालण्यासाठी त्याच्या विरूध्द हद्दपाराची कारवाई करण्यात आली आहे.
शहर आणि जिह्यातून एक वर्षासाठी तडिपार केलेले असताना त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असताना बुधवारी (दि.५) तो सिन्नरफाटा येथील बजरंग भेळभत्ता दुकानासमोर मिळून आला. याप्रकरणी अंमलदार अजय देशमुख यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.