नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रुग्णांला चुकीचे उपचार मिळाले तर त्याला विनाकारण त्रास होतो. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये घडला असून तो धक्कादायक आहे. या घटनेत पित्ताशयातील खड्यांच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरने महिलेची पित्त नलीकाच कापून टाकली. त्यानंतर चुकीच्या शस्त्रक्रियेच्या मोबदल्यात ११ लाखाची नुकसान भरपाई देण्याची ग्वाही देवून टाळाटाळ केल्याने परप्रांतीय महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. संतोष रावलानी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे. याबाबत सौम्या शशिधरण नायर (३० मुळ रा. विशाखापट्टणम,आंध्रप्रदेश हल्ली थेटे अपा.महाराष्ट्र शाळेजवळ,उपनगर) यांनी फिर्याद दिली आहे. नायर यांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास होता. त्यामुळे त्या पौर्णिमा स्टॉप परिसरातील संशयिताच्या संतोष मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल अॅण्ड डे केअर हॉस्पिटल येथे दाखल झाल्या होत्या. गेल्या महिन्यातील २३ ऑगष्ट रोजी पित्ताशयातील खड्यांची शस्त्रकिया झाली. शस्त्रक्रियेप्रसंगी वैद्यकीय निष्काळजीपणामुळे त्यांची पित्त नलीकाच कापून टाकण्यात आली. रक्तवाहीनीस छेडछाड करण्यात आल्याने त्यांच्या पित्त नलीकेस दुखापत झाल्याने त्यांना शहरातील सुयष हॉस्पिटल व त्यानंतर पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. उपचारानंतर नायर यांनी डॉ. रावलानी यांना गाठून जाब विचारला असता संशयिताने चुकीची कबुली देत ११ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली होती.
त्यानंतर पैश्यांचा तगादा लावत नायर व त्यांचे वडिल शशिधरण नायर यांनी पुन्हा डॉ. रावलानी यांची भेट घेतली असता संतप्त डॉक्टरने शशिरण नायर यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जात पैसे देण्यास नकार दिला. यावेळी त्याने तू कुठेही जा मी एक रूपया देणार नाही. तसेच तुम्हाला राज्यात राहू देणार नाही अशी धमकी दिल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत.