नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुटुंबिय घरात झोपलेले असताना तस्करांनी घरासमोरील चंदनाची झाड कापून नेले. ही घटना आडगाव शिवारातील दत्तनगर भागात घडली. याघटनेत भामट्यांनी आठ ते दहा वर्ष जुने झाड जमिनीपासून कापून नेले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय पंढरीनाथ लभडे (रा. ममता बंगला,शिवानंद पार्क समोर दत्तनगर) यांनी फिर्याद दिली आहे. लभडे कुटूंबिय सोमवारी (दि.३) रात्री झोपी गेले असता ही घटना घडली. लभडे यांच्या घरासमोर चंदनाचे झाड होते. आठ ते दहा वर्ष जुने असलेले झाड तस्करांनी कापून नेले. जमिनी पासून पाच ते सहा फुटाचे खोड भामट्यांनी पळविले असून अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.
चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकीची धडक देत भामट्यानी जखमी महिलेच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना सिडकोतील अश्विननगर भागात घडली असून या घटनेत महिलेच्या डाव्यापायाचे हाड मोडले आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत करून जबरीचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा चंद्रकांत चौधरी (५५ रा.शांताई बंगला,अश्विननगर.सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी या सोमवारी (दि.३) सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. स्वामी विवेकानंद जलतरण तलावा समोरील रस्त्याने त्या पायी जात असतांना ही घटना घडली. पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्याना जोरदार धडक दिली.
या घटनेत पाय मोडल्याने त्या रस्त्यावर पडल्या असता डबलसिट असलेल्या भामट्यांनी त्यांना मदतीचा हात न देता त्यांच्या गळ््यातील सुमारे १ लाख ६५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक घुनावत करीत आहेत.
……..