नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तुमच्या अकाऊंटला टाकलेले २० लाख रुपये कुठे आहेत? ते आम्हाला परत द्या, अशी मागणी करीत सहा जणांच्या टोळक्याने शहरातील एका डॉक्टरच्या घरात घुसून धुडगूस घातल्याची घटना कॉलेज रोड भागात घडली. या घटनेत टोळक्याने कुटूंबियास धक्काबुक्की करीत डॉक्टरच्या भावास मारहाण केली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. संजय चंपालाल मुंदडा (रा. येवलेकर मळा, कॉलेज रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मुंदडा कुटुंबिय मंगळवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास घरात असतांना अचानक पाच ते सहा जणांच्या अनोळखी टोळक्याने आरडाओरड करीत घरात प्रवेश केला. यावेळी एकाने ब्रिजेश मुंदडा कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केल्याने घरातील सदस्यांनी हॉलमध्ये धाव घेतली. काय प्रकार आहे हे समजण्यापूर्वीच एकाने आम्ही तुमच्या अकाऊंटला टाकलेले २० लाख रुपये कुठे आहेत? ते आम्हाला परत द्या.
त्यावेळी डॉ. मुंदडा यांचा पुतण्या सिद्धार्थ याने तुमच्यातील एकाने येथे थांबा व बाकीच्यांनी बाहेर जा असा सल्ला दिला असता ही घटना घडली. टोळक्याने ब्रिजेश मुदडा यांना पकडून घराबाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत ब्रिजेश यांना दारातच शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी घरातील सदस्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने कुटूंबियाना धक्काबुक्की केली. त्यात महिलांचाही समावेश आहे. या झटापटीत ब्रिजेश याच्या गळ्यातील सोनसाखळी तुटून गहाळ झाली आहे. संतप्त टोळक्याने चप्पल स्टॅण्ड कुटुंबियांच्या दिशेने भिरकावत पोबारा केला असून याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.