नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणात गेल्या सहा महिन्यापासून गुंगारा देणारा तस्कर पोलीसांच्या जाळयात अडकला. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने अमृतधाम भागात संशयितास बेड्या ठोकल्या असून त्यास भद्रकाली पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
रविंद्र एकनाथ मोहिते (४० रा. गंगोत्री विहार, अमृतधाम) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अंबड आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणात तो गेल्या सहा महिन्यांपासून गुंगारा देत होता. युनिट २ चे हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित पोलीसांच्या जाळयात अडकला. ड्रग्ज तस्कर आपल्या घरी आला असल्याची माहिती मिळताच पथकाने सोमवारी (दि.३) धाव घेत सापळा लावून राहत्या घरात त्याच्या मुसक्या आवळल्या. दोन्ही गुन्हयांची संशयिताने कबुली दिली असून त्यास गेल्या सप्टेंबर महिन्यात भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर,सहाय्यक निरीक्षक समाधान हिरे,उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी,जमादार प्रेमचंद गांगुर्डे,हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर,चंद्रकांत गवळी,प्रकाश महाजन,वाल्मिक चव्हाण,अंमलदार प्रविण वानखेडे आदींच्या पथकाने केली.