नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जेलरोड भागात प्रवासात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसांनी रिक्षातील सह प्रवाश्यास बेड्या ठोकल्या. शनिवारी (दि.१) रात्री ही घटना घडली होती. द्वारका परिसरात संशयिताच्या मुसक्या आवळण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकास यश आले असून, त्यास उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
सुनिल बाळासाहेब देशमुख (३६ रा. सारडा सर्कल,कोळीवाडा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जेलरोड भागात रिक्षातून प्रवास करणा-या महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. रिक्षाचालकाचा मित्र असलेल्या सहप्रवाशाने महिला एकटी असल्याची संधी साधत गळयात हात घालून तिचा विनयभंग केला. महिलेने चालकाकडे रिक्षा थांबविण्याची विनंती केली असता त्याने आपले वाहन दामटले होते.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चालक व त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास उपनगर पोलीसांनी तर पसार झालेल्या संशयितास युनिट २ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. जमादार प्रेमचंद गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा लावून द्वारका भागात संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्यास उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर,सहाय्यक निरीक्षक समाधान हिरे,जमादार प्रेमचंद गांगुर्डे, गुलाब सोनार,सुहास क्षिरसागर व हवालदार प्रकाश महाजन आदींच्या पथकाने केली.