नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अशोकस्तंभ ते घारपुरे घाट दरम्यान ट्रॅक्टर ट्रालीचे चाक अंगावरून गेल्याने ३१ वर्षीय दुचाकीस्वार महिलेचा चिरडून मृत्यू झाला. अज्ञात वाहनाचा धक्का लागल्याने महिला ट्रॅक्टरच्या चाकाखाली आली होती. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अलका देवराज गुज्जर (रा. बोरगड म्हसरूळ ) असे मृत महिलेचे नाव आहे. गुज्जर या सोमवारी (दि.३) दुपारी अशोक स्तंभ भागात आल्या होत्या. साडे अकराच्या सुमारास त्या मोपेड दुचाकीवर परतीच्या प्रवासास लागल्या असता हा अपघात झाला. अशोकस्तंभाकडून मोरवाडीच्या दिशेने त्या जात असतांना घारपुरे घाट येथील आधाराश्रम भागातील द्वारका फरसाण या दुकानासमोर हा अपघात झाला. पुढे जाणा-या ट्रॅक्टर जवळून त्या प्रवास करीत असतांना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाचा दुचाकीस धक्का लागला.
या अपघातात पडल्याने त्या थेट ट्रक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली आल्या. अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने त्यांचा चेंदामेंदा झाला. पती नारायण जोंधळे व स्थानिकांनी मदतकार्य हाती घेत त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, या अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने पोबारा केला. अपघातामुळे मात्र परिसरात काही काळ वाहतुक खोळंबा झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.