नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गिझरच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ७८ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. हा अपघात कॅनडा कॉर्नर भागात झाला होता. गेली दोन तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेमलता गोविंद नातू (रा.न्यु उषा किरण सोसा.वसंत मार्केट समोर) असे मृत वृध्देचे नाव आहे. हेमलता नातू या गेल्या गुरूवारी (दि. २७) सकाळच्या सुमारास आपल्या घरातील बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेल्या असता ही घटना घडली होती. गरम पाणी काढत असतांना अचानक गॅस गिझरमध्ये भडका उडाल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या.
कुटूंबियांनी त्याना तातडीने गंगापूररोडवरील श्रीगुरूजी हॉस्पिटल येथे दाखल केले होते शनिवारी (दि.१) अधिक उपचारार्थ त्यांना संकल्प हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असता डॉ. राहूल पाटील यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.