नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आर्थिक व्यवहारातून २७ वर्षीय तरूणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृताच्या पत्नीसह दहा नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या वर्षी ऑगष्ट महिन्यात साईकृपानगर भागात घडली होती. याबाबत न्यायालयात दाद मागण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.
सागर विठ्ठल बेलदार, दिपाजंली रोहित बेलदार (रा.रामेश्वर कॉलनी,मखमलाबाद), विजय ज्ञानेश्वर कुमावत (रा.विरवाडे ता.चोपडा जि.जळगाव), विजय, अजिंक्य शाम धोंगडे, प्रशांत, महेश गायकवाड, रवी,जोमान व प्रिया अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत प्रकाश लक्ष्मण बेलदार (रा.रामवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रकाश बेलदार यांच्या रोहित प्रकाश बेलदार (२७ रा.आशिर्वाद ग्लोरी बिल्डींग, साईकृपानगर) यांनी गेल्या वर्षी ३ ऑगष्ट रोजी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती.
या आत्महत्येस संशयित जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला असून संबधीताशी असलेल्या आर्थिक व्यवहाराच्या कारणातून मुलास शिवीगाळ व दमदाटी करून शारिरीक व मानसिक छळ करण्यात आल्याने मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. मुलाच्या मृत्यूनंतरही पोलीसांनी वेळीच पाऊल न उचलल्याने पित्याने याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. अखेर कोर्टाच्या आदेशानन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.