नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मखमलाबादरोडवरील उदयनगर भागात पती पत्नीचा वाद टोकाला गेल्याने साडे पाच वर्षाच्या मुलीचा ताबा उच्चन्यायालयाच्या आदेशाने घेण्यासाठी गेलेल्या पथकावर पित्याने शिवीगाळ व दमदाटी करत हल्ला केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश अशोक जगदाळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलीस निरीक्षक आम्रपाली त्र्यंबक तायडे यांनी फिर्याद दिली आहे. जगदाळे दांम्पत्याचा कौटूंबिक कलहाचा वाद न्यायालयात पोहचला आहे. या दांम्पत्यास साडे पाच वर्षांची मुलगी असून पत्नी घर सोडून गेली असली तरी मुलीचा सांभाळ मात्र पती जगदाळे करतात. जगदाळे दांम्पत्यातील वाद विकोपाला गेल्याने पत्नीने अज्ञान मुलीचा ताबा मिळावा यासाठी उच्चन्यायालयात धाव घेतली आहे. औरंगाबाद खंडपीठात या वादावर नुकतीच सुनावणी झाली.
पत्नीच्या बाजूने निकाल देत न्यायालयाने मुलीचा ताबा घेण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक तायडे यांचे पथकाने शनिवारी (दि.१) संशयित जगदाळे याच्या उदयनगर भागात धडक दिली असता ही घटना घडली. संशयिताने साध्या वेश्यात पोहचलेल्या पोलीस पथकास मुलाची ताबा देण्यास हरकत घेत त्याना शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी संतप्त जगदाळे यांनी चिमुकलीसाठी पोलीसांच्या खाकी वर हात उचलत हल्ला केला. मात्र पथकाने संशयिताच्या ताब्यातून मुलीचा ताबा घेत तिला आपल्या आईच्या स्वाधिन केले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.