नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात मॅफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणा-या मालेगाव येथील दांम्पत्यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या अंगझडतीत सुमारे तीन लाख ६० हजार रूपये किमतीचा अमली पदार्थ मिळून आला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पावणे चार लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.
अब्दूल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबू (४५) व शबाना अब्दूल समद अन्सारी (४० रा.दोघे कमलापुरा आखाडा मशिदीजवळ मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दांम्पत्याचे नाव आहे. पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. रेल्वेस्थानक परिसरात सकाळी एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी पेडर दांम्पत्य येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार स्टेशनबाहेर सापळा लावण्यात आला होता. अन्सारी दांम्पत्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलीसानी दोघांना ताब्यात घेतले असता अंगझडतीत बाबू अन्सारी याच्याकडे ६१.५ ग्रॅम वजनाचा व सुमारे ३ लाख ७ हजार ५०० रूपये किमतीचा मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ मिळून आला. तर शबानाच्या अंगझडतीत सुमारे ५२ हजार ५०० रूपये किमतीचा व १०.५ ग्रॅम वजनाचा एमडी अमली पदार्थ आढळून आला.
संशयित दाम्पत्यास बेड्या ठोकत पथकाने त्यांच्या ताब्यातील अमली पदार्थासह अन्य वस्तू असा सुमारे ३ लाख ८० हजार ३०० रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयितांना मुद्देमालासह नाशिकरोड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे, सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी,विशाल पाटील,जमादार रंजन बेंडाळे,संजय ताजणे, देवकिसन गायकर हवालदार बळवंत कोल्हे अंमलदार गणेश वडजे,अनिरूध्द येवले,योगेश सानप,बाळासाहेब नांद्रे,चंद्रकांत बागडे व अर्चना भड आदींच्या पथकाने केली.