नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवळाली गावातील सुंदरनगर भागात बेकायदा पिस्तूल बाळगणा-या तरूणाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयिताच्या ताब्यातून पिस्तूलसह जीवंत काडतुसे असा सुमारे ३२ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने केली.
जय उर्फ मारी वाल्मिक घोरपडे (२१ रा. सुंदरनगर,देवळाली गाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सुंदरनगर भागात एका तरूणाच्या कमरेस पिस्तूल लावलेला असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि.१) पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पोलीसांची चाहूल लागताच त्याने रोकडोबावाडीच्या दिशेने धुम ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी पाठलाग करीत त्यास बेड्या ठोकल्या. संशयिताच्या अंगझडतीत गावठी कट्यासह दोन जीवंत काडतुसे मिळून आले असून संशयितास मुद्देमालासह उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मनाई व शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते.उपनिरीक्षक दिलीप सगळे,मलंग गुंजाळ,विजय सुर्यवंशी,सुनिल आडके,प्रदिप ठाकरे,गणेश भागवत,अक्षय गांगुर्डे,अशोक आघाव,सुनिता कवडे आदींच्या पथकाने केली.