नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून नुकत्याच तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याबाबत भद्रकाली,मुंबईनाका व सातपूर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. जुने नाशिक भागात राहणारे दुर्गादास पुरणदास नागदिवे (रा.सरिता अपा.शहनाई लॉन्स जवळ भद्रकाली) यांची एमएच १५ जेबी ८२१८ मोटारसायकल गेल्या मंगळवारी (दि.२५) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.
दुसरी घटना विधातेनगर भागात घडली. सविता मंगेश लोखंडे (रा.विधातेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लोखंडे यांची प्लेझर एमएच १९ एके ५७२९ गेल्या सोमवारी (दि.२४) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यानी पळवून नेली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
तिसरी घटना सातपूर परिसरातील व्हिक्टर पॉईंट भागात घडली. याबाबत विजय विष्णू गांगुर्डे (रा.जनता विद्यालयाजवळ,ड्रीम सिटी समोर शिवाजीनगर नाशिकपुणा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. गांगुर्डे गेल्या शनिवारी (दि.२२) सायंकाळी सातपूर परिसरातील व्हिक्टर पॉईंट भागात गेले होते. हॉटेल मधुशाळा येथील पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच १५ जेके ६४३३ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घारे करीत आहेत.