नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तंटामुक्ती समिती अध्यक्षावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करणा-या टोळीतील चौघांना ग्रामिण पोलीसांनी गजाआड केले आहे. गोवर्धन गावात ही घटना घडली होती. अंबड औद्योगीक वसाहतीतील वेगवेगळया भागात या चार जणांना पकडण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूलसह तलवार, चाकू अश्या धारदार शस्त्रांसह गुह्यात वापरलेली हुंडाई कार जप्त करण्यात आली आहे. या टोळीतील उर्वरीतांचा शोध सुरू असून ते लवकरच पोलीसाच्या हाती लागतील असा विश्वास पोलीस सुत्रांनी वर्तविला आहे. ही कारवाई नाशिक तालूका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली.
रोशन दिलीप जाधव (२४ रा.धर्माजी कॉलनी), तुषार विठ्ठल कापसे (२१),गौरव उर्फ बाळा जयराम माडे (२१) व अजय मनोज कापसे (२१ रा. तिघे राजीवनगर गोवर्धनगाव ता.जि.नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किशोर पिराजी जाधव यांनी फिर्याद दिली होती. जाधव गेल्या शनिवारी (दि. २२) रात्री त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर बसलेले असतांना ही घटना घडली होती. परिसरात हातात धारदार शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजविणाºया टोळक्याने आपला मोर्चा जाधव यांच्याकडे वळवित आदल्या दिवशी झालेल्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेळी रोशन जाधव या संशयिताने पिस्तूल रोखत किशोर जाधव याच्या दिशने गोळीबार केला. मात्र किशोर जाधव यांनी प्रसंगावधान राखल्याने हवेत बार उडला होता.तर बाळा माडे याने हातातील तलवारीचा धाक दाखवून दमदाटी केली. यानंतर, काही क्षणांत संशयित पसार झाले.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्याने तालूका पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखा कामाला लागली होती. जमादार नवनाथ सानप व हवालदार शितलकुमार गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पाथर्डी फाटा व अंबड परिसरात चौघांच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून पिस्तूल,तलवार चाकूसह गुन्हयात वापरलेली एमएच ०१ बीजी ६५३५ ही कार जप्त करण्यात आली आहे. संशयितांच्या उर्वरीत साथीदारांच्या शोधार्थ पथके कार्यरत असून लवकरच ते हाती लागतील असा विश्वास पोलीस सुत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मुद्देमालासह संशयितांना तालूका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर, पेठचे उपविभागीय अधिकारी वासूदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक राजू सुर्वे,तालूका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित आमले,सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर,संदेश पवार,अंमलदार नवनाथ सानप,नंदू वाघ,शितलकुमार गायकवा,विनोद टिळे,संदिप नागपुरे,दिपक पाटील,मंगेश पानझडे,निलेश मराठे,हेमंत गिलबिले व प्रदिप बहिरम आदींच्या पथकाने केली.