नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पैसे काढण्यासाठी एटीएम बुथमध्ये गेलेल्या सेवानिवृत्त वृध्दाच्या गळयातील सोनसाखळी हेल्मेट घातलेल्या भामट्यांनी ओरबाडून नेल्याचा प्रकार वडाळा पाथर्डी मार्गावर घडला. या घटनेत भामट्यांनी ६० हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवर पोबारा केला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालीग्राम दौलतराव काळदाते (७४ रा.जयभवानीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. काळदाते गेल्या गुरूवारी (दि.१३) इंदिरानगर भागात गेले होते. गजानन महाराज मंदिर परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएम बुथमध्ये पैसे काढण्यासाठी ते गेले असता ही घटना घडली.
बुथ मध्ये शिरत असतांना दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांपैकी एकाने पळत जावून त्यांच्या गळयातील सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवर पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.