नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी एका वृध्द महिलेचे सुमारे दोन लाख रूपये किमतीचे अलंकार पळविले. मदतीचा बहाणा करून भामट्यांनी महिलेच्या गळ््यातील सोनसाखळी, बांगड्या व अंगठ्या आदी दागिणे हातोहात लांबविले. ही घटना कामटवाडा भागातील विठ्ठलनगर येथे घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लीला राधेश्याम पाटील (६५ रा. प्रभूतीर्थ अपा.कार्तिकेयनगर) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील गुरूवारी (दि.२७) सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या परिसरात चक्कर मारून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी जात असतांना एकाने आवाज देवून त्यांना बोलावले. यावेळी आमचे साहेब तुम्हाला बोलवत असल्याचे सांगितल्याने पाटील या दुचाकीवर हेल्मेट घालून बसलेल्या इसमाकडे गेल्या असता ही घटना घडली. सदर व्यक्तीने या भागात खून झाला असून सर्वत्र चेकिंग सुरू आहे. अधिकारी असल्याची बतावणी करीत सदर व्यक्तीने दागिणे घालून फिरणा-यांना दोनशे रूपयांचा दंड करण्यात येणार असल्याचा सल्ला देत अंगावरील अलंकार काठून ठेवण्याचा सल्ला दिला.
यावेळी त्याने आपल्या हातातील कागद पाटील यांच्या साडीच्या पदरामध्ये ठेवत त्यात दागिणे ठेवण्यासाठी मदतीचा हात देत अलंकार हातोहात लांबविले. पाटील यांनी घरी जावून दागिण्यांची तपासणी केली असता कागदात अलंकार मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्ष घुनावत करीत आहेत.