नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाशिवरात्री निमित्त देवदर्शनासाठी मंदिराच्या रांगेत उभ्या असलेल्या शिवभक्ताची सोनसाखळी भामट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना कपालेश्वर मंदिर परिसरात घडली. या घटनेत भामट्यांनी गर्दीची संधी साधत दोन तोळे वजनाची व सुमारे एक लाख दहा हजार रूपये किमतीच्या सोनसाखळीवर डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमर ईश्वर पारेकर (रा.अनुसयानगर टाकळीरोड द्वारका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पारेकर गेल्या बुधवारी (दि.२६) महाशिवरात्रीनिमित्त पत्नी व मुलीस सोबत घेवून कपालेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी गेले असता ही घटना रात्रीच्या सुमारास गर्दीत रांगेत उभे असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे १ लाख १० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविली. देवदर्शन आटोपून घरी परतल्यानंतर ही बाब समोर आली. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.