नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बेकायदा पिस्तूल बाळगणारा कारचालक पोलीसांच्या हाती लागला. स्टॉप अॅण्ड सर्च कारवाईत संशयित पोलीसांच्या जाळ्यात अडकला असून त्याच्या ताब्यातून ब्रिझा कारसह अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे असा सुमारे ७ लाख ३२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन दत्तात्रेय कवरे (३६ रा. शिवकल्प रेसि.शांतीनगर) असे संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे. कॉलेजरोड भागात बिटमार्शल म्हणून कर्तव्य बजावणारे अंमलदार प्रविण केदारे व सोपान निगळ यांनी बुधवारी (दि.२६) रात्री अन्य गस्ती पथकांना मदतीस बोलावून घेत अचानक नृहसिंगनगररोडवरील नेर्लेकर चौकात अचानक स्टॉप अॅण्ड सर्च मोहिम हाती घेतल्याने संशयित पोलीसांच्या जाळय़ात अडकला. मदिरा वाईन परिसरात पार्क केलेल्या एमएच १५ जेएम ४४४८ या ब्रिझा कारची पथकाने तपासणी केली असता चालक सिटाच्या खाली जीवंत काडतुसांनी भरलेला देशी बनावटीचा पिस्तूल मिळून आला.
चालकास बेड्या ठोकत पथकाने कारसह पिस्तूल असा सुमारे सात लाख ३२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार प्रविण केदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार करीत आहेत. ही कारवाई गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निखील पवार,उपनिरीक्षक मोतीलाल पाटील,अंमलदार प्रविण केदारे,सोपान निगळ,संदिप पवार व सुनिल कुवर आदींच्या पथकाने केली.