नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस रेकॉर्डवरील सराईतानी दारू दुकानदाराकडे दरमहा खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. दमदाटी करीत टोळक्याने व्यवस्थापकाच्या खिशातील अडिच हजार रूपयांची रोकड बळजबरी काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल नंदन आणि त्याचे तीन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत बाबासाहेब शिवाजी बढे (रा.रामवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बढे मालेगाव स्टॅण्ड येथील एस.पी.लोणारी देशी दारू दुकानावर व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. बुधवारी (दि.२६) रात्री ते नेहमी प्रमाणे आपला व्यवसाय सांभाळत असतांना संशयितांनी त्याना गाठले.
दारू दुकानात शिरलेल्या टोळक्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी माझ्यावर किती गुन्हे दाखल आहेत हे माहीत आहे ना असे म्हणत बढे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच त्यांच्या खिशातील अडिच हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेण्यात आली. जातांना टोळक्याने तुझ्या मालकाला सांगून दरमहा दोन हजार रूपये दे नाही तर तुला व घरच्यांना जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.