नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गर्दीची संधी साधत बसमध्ये चढतांना वृध्द महिलेच्या पिशवीतील रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार द्वारका भागात घडला. या घटनेत ६० हजार रूपयांची रोकड भामट्यांनी हातोहात लांबविली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजनाबाई काशिनाथ गिते (६५ रा.खोपडी ता.सिन्नर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गिते मंगळवारी (दि.२५) शहरात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी द्वारका सर्कल भागात थांबल्या असता ही घटना घडली.
सिन्नर बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधून अज्ञात भामट्यांनी कापडी पिशवीत ठेवलेली ६० हजाराची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास उपनिरीक्षक गवांदे करीत आहेत.