नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑर्डरचे पैसे रिफंड करून देत असल्याचा बहाणा करून सायबर भामट्यांनी शहरातील एकाच्या बँक खात्यावर डल्ला मारला. गोपनिय माहिती मिळवीत भामट्यांनी बँक खात्यातील दोन लाख रूपये परस्पर काढून घेतले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र अशोक डगळे (रा.उपेंद्रनगर बसस्टॉप समोर उपेंद्रनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डगळे यानी ऑनलाईन खरेदीसाठी पैसे अदा केले होते. मात्र ऑर्डर वेळेत न मिळाल्याने त्यांनी ती रद्द केली. यानंतर गेल्या ११ जानेवारी रोजी भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. ८५२३०४५८९३ आणि ८२५०८३१५२९ या मोबाईलधारकांनी त्यांच्याशी संपर्क साधत मिशो वेबसाईट कस्टमर केअर सेंटर मधून बोलत असल्याची बतावणी करीत ही फसवणुक केली.
तुम्ही केलेल्या ऑनलाईन ऑर्डरचे पैसे रिफंड करून देतो असे सांगत भामट्यानी त्याना विश्वासात घेत बँक खात्याची गोपनिय माहिती मिळविली. यानतर त्याच्या बँक खात्यातील दोन लाख पाच हजाराची रक्कम परस्पर ऑनलाईन पध्दतीने अन्य खात्यात वर्ग करून काढून घेण्यात आली असून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच डहाळे यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.