नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीची मालिका सुरू असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे नऊ लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घरफोडी मिलींद नगर ते गोविंदनगर लिंकरोड भागात झाली. याबाबत विमलचंद चंदनमल सोनी (७५ रा. अनमोल नयनतारा बाजीरावनगर,तिडके कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या वर्षभरात अज्ञात चोरट्याने सोनी यांच्या घरात प्रवेश करून ही चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील अलमारीत ठेवलेले सुमारे ५ लाख आठ हजार रूपये किमतीचे वडिलोपार्जीत सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले. ही बाब नुकतीच उघडकीस आली असून, विजया सोनी या अंगावर घालण्यासाठी अलंकार घेण्यासाठी गेल्या असता चोरीचा हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.
दुसरी घटना वंजारवाडी ता.जि.नाशिक येथे घडली. मोहन रामभाऊ सामोरे (५० रा.मारूती मंदिराजवळ,वंजारवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सामोरे कुटुंबिय रविवारी (दि.२३) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून धान्याच्या कोठीत ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातील साडे चार लाख रूपयांची रोकड व सोन्याची नथ असा सुमारे ४ लाख ६० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक वाजे करीत आहेत.