नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सेवा निवृत्त वृध्दास परिचीतांनी आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हात उसनवार घेतलेल्या सव्वा सात लाख रूपयांच्या रकमेपोटी दिलेला धनादेश परत आल्याने वृध्दाने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद रफिक शेख,निलोफर जावेद शेख (रा.दोघे विधी दर्शन अपा.त्रिवेणी पार्क शिवाजीनगर जेलरोड ) व रफिक शेख (रा.पावना धाम, ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत फ्रान्सिस शांतवन तिमोथी (७४ रा. इंगोले निवास समोर,जेलरोड) यानी फिर्याद दिली आहे. तिमोथी आणि शेख कुटुंबिय एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात कौटूंबिक संबध आहेत. एकमेकांच्या अडीअडचणीला दोघे कुटूंबिय धावून येत असल्याने त्यांच्यात आर्थिक व्यवहार होते.
सन. २०१७ ते २०२३ दरम्यान शेख कुटूंबियांनी वेळोवेळी तिमोथी यांच्या कडून आर्थिक अडचण भागविण्यासाठी ७ लाख ३० हजाराची रक्कम हात उसणवार घेतली होती. तिमोथी यांनी पैश्यांचा तगादा लावल्याने संशयितांनी १७ आॅक्टोबर २०१९ रोजी त्यांना पाच लाख रूपयांचा धनादेश दिला होता. मुदतीत पैसे न मिळाल्याने तिमोथी यांनी आपल्या बॅकेत धनादेश वटविण्यासाठी टाकला असता तो खाते बंद असल्याने परत आला. त्यामुळे तिमोथी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्ष अहिरे करीत आहेत.