नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घरात कुटुंबिय झोपलेले असतांना उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी मोबाईलसह रोकड असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना अशोका मार्ग भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत विश्वास धोंगडे (रा.साईबाबा मंदिरामागे,कल्पतरूनगर अशोका मार्ग ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धोंगडे कुटुंबिय बुधवारी (दि.१९) रात्री आपल्या घरात झोपी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बेडरूमच्या उघड्या खिडकीत हात घालून टेबलावरील दोन मोबाईल,इअरफोन व पाकिट चोरून नेले. या पाकिटात २ हजार १०० रूपयांची रोकड होती. या घटनेत ११ हजार १०० रूपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला असून, अधिक तपास जमादार रोहिदास सोनार करीत आहेत.
महिलेच्या गळयातील सोन्याची पोत चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वॉकिंगसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरातील सयाजी हॉटेल भागात घडली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीना प्रकाशचंद छाजेड (रा.सिध्दीविनायक गणपती मंदिरासमोर,विनयनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. छाजेड शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी वॉकिंगसाठी घराबाहेर पडल्या होत्या. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या दिशेने त्या पायी जात असतांना सयाजी हॉटेल भागात समोरून दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे २० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक मुस्तफा शेख करीत आहेत.
२२ वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील कामटवाडा भागात राहणा-या २२ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिनेश बलराम यादव (रा.संतोष अपा.हॉटेल बनियान ट्री समोर) असे मृत युवकाचे नाव आहे. यादव याने शुक्रवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच चुलत भाऊ आकाश यादव यानी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.