नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातांमध्ये दुचाकीवर डबलसिट प्रवास करणा-या वृध्द महिलेसह एकाचा मृत्यू झाला. तर नाणेगाव ता.जि.नाशिक येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तारवालानगर ते हिरावाडीरोडवरील लोखंडे मळा भागात रविवारी (दि.२२) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव एनएल ०१ एएफ २५९८ या भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने पुढे जाणा-या एमएच १७ बीवाय ७१८३ या पिकअपसह एमेच १५ ईएक्स ११६२ या अल्टोकारला घडक दिली. यात समोरून येणा-या एमएच १५ एफएस २३०१ दुचाकीस धक्का लागल्याने ही घटना घडली. या अपघातात दुचाकीवर डबलसिट प्रवास करणा-या मायलेकांपैकी प्रेमलताबाई पृथ्वीराज बेदमुथा (६९ रा.दत्तदर्शन रो हाऊस लामखेडे मळा ) यांच्या अंकावरून पिकअपचे चाक गेल्याने त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. तर मुलगा पंकज बेदमुथा हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याबाबत अंमलदार दिपक शिलावट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.
तर नाणेगाव येथे झालेल्या अपघातात नामदेव छबू सोनवणे या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याबाबत दत्तू चिमाजी भागवत (५६ रा. करंजकर गल्ली भगूर ) यांनी फिर्याद दिली आहे. मृत सोनवणे व भागवत हे दोघे मित्र गेल्या शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी एमएच १५ जीवाय ४५११ या दुचाकीने सोनवणे यांच्या शेतात गुरांना वैरण टाकण्यासाठी जात असतांना हा अपघात झाला. जय महाराष्ट्र हॉटेल समोर समोरून भरधाव येणा-या एमएच १५ जीझेड ७७३३ दुचाकीने दोघा मित्रांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात सोनवणे यांचा मृत्यू झाला या अपघातात भागवत यांच्यासह शिवनाथ पाटोळे व अंकित रोकडे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात शिवनाथ मुरलीधार पाटोळे (२५ रा.नाणेगाव ता.जि.नाशिक) या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.