नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धमकी दिल्याने २२ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरूणीशी विवाह करू नये असे धमकवल्याने युवकाने टोकाचे पाऊल उचलले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार माजीद असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत सर्फराज शेरखान पठाण (रा.नानावली मज्जीद जवळ) यानी फिर्याद दिली आहे. पठाण यांच्या मामाचा मुलगा अरमान ऐहेसान इलाही कुरेशी (२२ रा.फुले मार्केट घास बाजार,कोकणीपुरा) या युवकाने २८ जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरी स्टोअरेज रूममध्ये लोखंडी अॅगलला ओढणी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली होती.
ही आत्महत्या माजीद नावाच्या तरूणाने धमकी दिल्याने केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अरमान हा वैष्णवी नावाच्या मुलीशी विवाह करणार होता. याबाबत माजीद यास माहिती होती. मात्र त्याने एकतर्फी प्रेमातून वैष्णवीशी लग्न करू नये यासाठी अरमान यास धमकावले होते. वारंवार शिवीगाळ करीत वैष्णवीशी संबध ठेवू नको तिच्याशी बोलू नको नाही तर तुझे काही खरे नाही अशी दमदाटी केल्याने त्याने मानसिक त्रासातून टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.