नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत एका परिचीताने विनयभंग केल्याची घटना गंगापूररोड भागात घडली. संशयिताने गावाकडे जावून मुलीची बदनामी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश नामक युवकाविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित व पीडित मुलगी परिचीत असून ते एकाच गावातील रहिवासी असल्याचे कळते. गेल्या शुक्रवारी (दि.१४) रात्री मुलगी संगणकाच्या शिकवणीसाठी गंगापूररोडने रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली.
मुलीची वाट अडवित संशयिताने तिच्याकडे प्रेमाची मागणी करीत विनयभंग केला. यानंतर त्याने गावात बदनामी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून मुलीच्या पालकांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काळे करीत आहेत.