नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात तडिपारांचा वावर वाढला आहे. कारवाई करूनही नाकावर टिच्चून शहरात वावर ठेवणा-या दोन तडिपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई बजरंगवाडी आणि सिडकोतील पवननगर भागात करण्यात आली असून, याप्रकरणी अंबड आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रूपेश मधुकर पिठे (२१ रा,शनी चौक,बजरंगवाडी) व शंतनू आण्णासाहेब भोर (२७ रा. सावतानगर,सिडको) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपार गुंडाची नावे आहेत. संशयितांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहर व जिह्यातून दोघांना वेगवेगळ्या कालावधीसाठी हद्दपार केलेले असतांनाही ते शहरात मिळून आले.
पिठे मंगळवारी (दि.१८) रात्री त्याच्या घर परिसरात मिळून आला तर भोर बुधवारी (दि.१९) पवननगर येथील पाण्याची टाकी भागात पोलीसांच्या हाती लागला. याबाबत अंमलदार समीर शेख व मयुर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार सोनर आणि हवालदार बनतोडे करीत आहेत.