नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांचा परिचीतांनी विनयभंग केला. घरखाली करण्याची धमकी देत बापलेकाने एकीचा तर भररस्त्यात दुसरीचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिरावाडीतील शक्तीनगर भागात राहणा-या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती गेल्या १० डिसेंबर रोजी आपल्या घरात एकटी असतांना नारायण श्रीराम शर्मा व अंकुश नारायण शर्मा (रा.दोघे हिरावाडी) या बापलेकाने तिच्या घरात बेकायदा प्रवेश करून विनयभंग केला. घर खाली कर नाही तर तुला बघून घेवू अशी धमकी देत संशयितांनी हे कृत्य केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.
दुसरा प्रकार जुने नाशिक भागातील कुंभारवाडा भागात घडला. पीडिता शुक्रवारी (दि.१४) रात्री जेवण आटोपून शतपावलीसाठी घराबाहेर पडली असता ही घटना घडली. परिसरातून ती फेरफटका मारीत असतांना मुन्ना कासार (रा.कुंभारवाडा) या संशयिताने तिला गाठले. संशयिताने शिवीगाळ व दमदाटी करीत तिचा विनयभंग केला. यावेळी संतप्त संशयिताने भररस्त्यात हातातील दारूची बाटली फोडून तिच्यावर लघवी केली. यावेळी परिसरातील नागरीक पीडितेच्या मदतीला धावून आले असता त्याने धारदार चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.