नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सीएनजी पंपावर नंबरच्या वादातून दोघांनी एका कारचालकास बेदम मारहाण केल्याची घटना सिन्नर फाटा भागात घडली. या घटनेत हातातील लोखंडी कड्याने मारण्यात आल्याने कारचालक जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश हरिश्चंद्र डोंगरे (३६ रा.सरस्वतीनगर,पंचकगाव जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डोंगरे गेल्या शुक्रवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास एमएच ०२ डीझेड ५७८४ या कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी सिन्नरफाटा भागात गेले होते. सीएनजी पंपावर ते रांगेत कार लावून बसलेले असतांना ही घटना घडली.
पुढे उभ्या असलेल्या एमएच ०५ सीएम ८६३३ या कारमधील चालकासह त्याच्या साथीदाराने डोंगरे हे नंबर सोडून कार पुढे घेत असल्याच्या संशयातून त्यांना शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या शाब्दीक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संशयिताने हातातील लोखंडी कडे डोक्यावर मारल्याने डोंगरे यांना दुखापत झाली असून अधिक तपास पोलीस नाईक ए.टी.पवार करीत आहेत.