नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खोट बोलल्याच्या रागातून पतीने मारहाण केल्याने पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत विवाहीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पतीसह सासरच्या मंडळीविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश आहिरे, सरूबाई आहिरे, सुषमा डावरे, सुलभा सुरंजे व राहूल आहिरे अशी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत बाबुलाल बंडू आहिरे (रा.बारागाव पिंप्रीरोड सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. सुरेखा योगेश आहिरे (३५ रा.हिवाळेवाडी,गोरेवाडी ना.रोड) या विवाहीतेने गेल्या शुक्रवारी (दि.६) आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.
पतीसह सासरच्या जाचास कंटाळून सुरेखा आहिरे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेपूर्वी खोटे बोलल्याच्या रागातून पतीने तिला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहेत.