नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एकाने लग्नाचे आमिष दाखवत महिलेस वेगवेगळया ठिकाणी घेवून जात बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षद काशिनाथ क्षिरसागर (रा.मोखाडा जि.पालघर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. २०२० मध्ये पीडिता व संशयितामध्ये फेसबुक या सोशल साईटच्या माध्यामातून संपर्क झाला होता. महिलेने आपबिती कथन केल्यानंतर संशयिताने तिचा विश्वास संपादन करीत लग्नाचे आमिष दाखविले.
या काळात संशयिताने महिलेच्या घरी जाऊन तसेच खुटवड नगर भागातील एका लॉजवर घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला. महिलेने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक नितीन फुलपगारे करीत आहेत.