नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महामार्गास लागून असलेल्या अश्विन नगर येथील सायबर भामट्याचे कॅालसेंटर पोलीसानी उदध्वस्त केले. या कारवाईत सहा जणासह एका महिलेस बेड्या ठोकत पथकाने घटनास्थळावरून महागडे १२ लॅपटॉप व १३ मोबाईल सर्व व रोकड असा सुमारे ४७ हजार ६०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे अमिरेकन पाहूण्यांना या टोळीकडून लक्ष करण्यात आले होते. इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधून ही टोळी संगणकात बिघाड आणि व्हायर असल्याचे सांगून गिफ्ट व्हाऊचर्स खरेदीच्या नावाखाली संशयितांनी दीडशे जणांना तब्बल दोन कोटी रुपयांना फसविले आहे.
प्रणय अनिरूध्द जैस्वाल (३०),मुकेश गजानन पालांडे (४० रा.दोघे नालासोपारा पूर्व पालघर),साहिल खोकोन शेख (२४ रा.मालाड,पश्चिम मुंबई),आशिष प्रभाकर ससाणे (२८ रा.सांताक्रुझ पूर्व मुंबई), चांद शिवदयाल बर्नवाल (२७ रा.मीरा रोड पूर्व ठाणे),सादिक अहमद खान (२४ रा.मालवणी मालाड,मुंबई) व समिक्षा शंकर सोनावले (२४ रा.खर्डीपाडा ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीतील बिपीन साहू आणि रॉन उर्फ शादाब हे दोन म्होरके अद्याप फरार आहेत.
ॲपल व मायक्रोसॉफ्ट कंपन्यांच्या नावाने बनावट कॉल सेंटर चालवून अमेरिकेतल्या दीडशे नागरिकांना गंडा घालणा-या टोळीला बेड्या ठोकल्याची माहिती गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली. अश्निन नगरातील भूमी अपार्टमेंटसमोर असलेल्या जानकी बंगल्यात पोलिसांनी ही कारवाई केली. सायबर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे, सहाय्यक निरीक्षक प्रतिक पाटील, धीरज गवारे, अंमलदार मनिष धनवटे, मनोज पाटील, विकास पाटील आदींच्या पथकाने गुरूवारी (दि.१३) मध्यरात्री हा छापा टाकला. पथकाने बंगल्यात शिरून पाहणी केली असता बुक शेल्फ वाटेल असा दरवाजा आड कॉलसेंटर सुरू होते. कुणालाही कळणार नाही अशी व्यवस्था असलेला दरवाजा हुडकून काढत पथकाने कॉलींगवर असलेल्या संशयितांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांकडून कामकाज समजून घेतले असता ते अमेरिकन नागरीकांना त्यांच्या संगणकात मायक्रोसॉफ्ट व अॅपल कंपनीकडून नोटीफिकेशन पाठवित असल्याचे भासवित होते.
संगणकात बिघाड झाल्याचे तसेच गंभीर व्हायरस आक्रमण झाल्याचे नोटीफिकेशनच्या माध्यमातून सांगत असल्याचे पुढे आले. एखादा मासा गळाला लागला की त्यास कॉल सेंटरच्या टोल फ्री सारख्या मिळत्या जुळत्या क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगत या क्रमांकावरून कॉल आल्यास संबधीतास संगणकातील बिघाड दुर करण्यासाठी कमीत कमी २०० ते दोन हजार डॉलर्सचे गिफ्ट व्हावचर्स जवळच्या दुकानातून खरेदी करण्यास सांगून व्हॉवचरवरील क्रमांक जाणून घेत यातून भामट्यांनी शेकडो अमेरिकन नागरीकांना गंडा घातल्याचे पुढे आले आहे.