नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इन्शुरन्स कंपन्यांकडून मिळणारे अतिरिक्त बिझनेस कमिशन स्वत:च्या फायद्याकरिता नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करून भामट्या व्यवस्थापकाने एका नामांकित कंपनीस ३७ लाखास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश शालीग्राम राठी (रा. भागवतनगर नागपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत स्टर्लींग मोटर्स या नामांकित कंपनीचे व्यवस्थापक विवेक गोपाल माथूर (रा. वाकड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित सन.२०१९ मध्ये संशयित गडकरी चौकातातील कंपनीच्या कार्यालयात कार्यरत होता.
१ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान संशयिताने कंपनीला कोणतीही माहिती न देता अथवा परवानगी न घेता इन्शुरन्स कंपन्यांकडून मिळणारे अतिरिक्त बिझनेस कमिशन बेकायदेशीर मागार्ने स्वत:च्या फायद्याकरिता त्याची आई शकुंतला शालिग्राम राठी यांच्या बँक खात्यावर टाटा एआयजी लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून मिळालेली १२ लाख २८ हजार रुपयांची व शीतल चावला इन्शुरन्स कंपनीची १ लाख ४० हजार १२० रुपयांची रक्कम, भाचा पार्थ प्रशांत मुंदडा याच्या बँक खात्यावर स्पार्क कॉपोर्रेट, मॅग्मा जनरल इन्शुरन्स कंपनीचे २ लाख ७४ हजार ४९८ रुपये, बहीण माधुरी प्रशांत मुंदडा यांच्या बँक खात्यावर २ लाख ५० हजार ७८५ रुपये व ११ हजार ७३ रुपये, टाटा इन्शुरन्सचे ७ लाख ३६ हजार २००रुपये, मुलगा देवांश महेश राठी यांच्या खात्यावर ९९ हजार ५०५ रुपये, ९ लाख ४० हजार ९९४ व ३८ हजार रुपये अशी एकूण ३७ लाख १९ हजार ५७५ रुपयांची रक्कम स्वत:च्या फायद्याकरिता नातेवाईकांच्या खात्यावर वळवून स्टर्लिंग मोटर्स या कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वाघ करीत आहेत.