नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तीन कोटी रूपयांच्या कर्जाचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील एकास साडे तीन लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रोसेसिंग फी आणि अन्य कारणातून ही रक्कम लुबाडण्यात आली असून पाच महिने उलटूनही कर्ज पदरात न पडल्याने तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश देशपांडे,गणेश करचे व जितेंद्र शर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत उमेश रामदास ढोकळे (४५ रा.पंचवटी ) यानी फिर्याद दिली आहे. ढोकळे व्यावसायीक कर्ज प्राप्तीसाठी प्रयत्नशिल असतांना त्यांची गेल्या वर्षी संशयितांशी भेट झाली होती. सेवा फायनान्सिअल सर्व्हीसेस लि. या फायनान्स कंपनीकडून तीन कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
ढोकळे यांनी सर्व कागदपत्राची जमवा जमव करून संशयितांच्या स्वाधिन केले असता त्यांनी प्रोसेसिंग फीसह वेगवेगळी कारणे सांगून ढोकळे यांच्याकडून ३ लाख ४४ हजार रूपये उकळले ही रक्कम २७ ऑक्टोबर ते २६ नोव्हेबंर या दरम्यान क्यु आर कोड आणि ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात आली. पाच महिने उलटूनही कर्ज न मिळाल्याने ढोकळे यांनी पाठपुरावा केला असता संशयितांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.