नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काठेगल्ली भागात मागील भांडणाची कुरापत काढीत तरूणास बेदम मारहाण करून दुचाकीस्वार दुकलीने वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने २३ वर्षीय युवक जखमी झाला असून, उभ्या असलेल्या मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आल्याने मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार समिर तबारक चौधरी व जुनेद तबारत चौधरी (रा.दोघे काठेगल्ली,द्वारका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रोहित राजेश छाजेड (रा.ओमकार कॉलनी,काठेगल्ली) या युवकाने फिर्याद दिली आहे. छाजेड गेल्या मंगळवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास आपल्या घर परिसरात उभा असतांना पांढ-या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दुकलीने त्याच्याशी मागील भांडणाची कुरापत काढली.
यावेळी संतप्त दोघांनी शिवीगाळ करीत व जीवे ठार मारण्याची धमकी देत छाजेड यांना लाथाबुक्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेत संशयित दुकलीने घटनास्थळी उभ्या असलेल्या मोटारसायकलींचीही तोडफोड केली. अधिक तपास उपनिरीक्षक दिपक तोंडे करीत आहेत.