नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मागील भांडणाची कुरापत काढून चार जणांच्या टोळक्याने दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना चिंचोली ता.जि.नाशिक येथे घडली. या घटनेत एकाच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून दुस-यास दगड फेकून मारल्याने दोघे जखमी झाली आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिनाथ सानप, महेश सानप, आकाश सानप व आकाशचा अनोळखी मित्र अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत योगेश शंकर नवाळे (३० रा.चिंचोली ता.जि.नाशिक) या युवकाने फिर्याद दिली आहे. योगेश नवाळे व दिपक नवाळे हे दोघे बंधू गुरूवारी (दि.१३) चिंचोली येथील तलाठी कार्यालय परिसरात गेले होते. काम आटोपून ते घराकडे परतत असतांना ही घटना घडली. संशयित टोळक्याने दोघा भावांना अडवित जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घातला. यावेळी संतप्त टोळक्याने दोघा भावांना लाथाबुक्यानी बेदम मारहाण केली.
या घटनेत आदिनाथ सानप याने योगेश नवाळे याच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले तर दिपक नवाळे याने बचावासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास आकाश सानप याने दगड फेकून मारल्याने तो जखमी झाला आहे. यावेळी झालेल्या झटापटीत योगेश नवाळे याच्या गळय़ातील सोनसाखळी तुटून गहाळ झाली असून अधिक तपास हवालदार अनिल पवार करीत आहेत.