नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वर्दळीच्या एम.जी.रोड भागातील मोबाईल गल्लीत बुधवारी (दि.१२) छापेमारी केली. या कारवाईत दोन व्यावसायीकांकडे नामांकित कंपनीचे बनावट साहित्य विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात कॉपिराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीपाद कचरू घेगे (रा.साईनगर,अमृतधाम), त्याचा व्यवस्थापक व मयुर शशिकांत कुलकर्णी (रा.कॅबेला ह्यू, गुरूगोविंद कॉलेजजवळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यावसायकींची नावे आहेत. याबाबत कंपनीचे कुंदन गुलाबराव बेलोशे (रा.ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील मोबाईल गल्ली म्हणून ओळख असलेल्या एमजी रोडवरील व्यावसायीकांकडून राजरोसपणे सॅनडिस्क कंपनीच्या नावाचा वापर करून पेनड्राईव्ह,ओटीजी व मेमरी कार्ड आदी बनावट उपकरणांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीस प्राप्त झाली होती.
त्यानुसार कंपनी प्रतिनीधी बेलोसे यांनी शहरात धाव घेत पोलीसांच्या मदतीने छापा टाकला. याकारवाईत वरिल संशयितांच्या दुकानात बनावट उपकरणाची विक्री होत असल्याचे समोर आले असून या ठिकाणाहून सुमारे ३ लाख ९३ हजार ७७० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुरवाडे करीत आहेत.