नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक पुणे मार्गावरील नासर्डी पूल परिसरात दुचाकीस धडक देत कुरिअर व्यावसायीकास त्रिकुटाने लुटल्याची घटना घडली. या घटनेत भामट्यांनी डिक्कीतील साडे सोळा लाखाच्या रोकडसह दुचाकी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हितेंद्रकुमार अमृतलाल पटेल (५१ मुळ रा.म्हैसाना गुजरात हल्ली पंचवटी कारंजा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पटेल यांचा कुरिअर सेवा पुरविण्याची व्यवसाय आहे. पटेल प्राईम सर्व्हीसेस या कंपनीच्या माध्यमातून ते आपला व्यवसाय सांभाळतात. मंगळवारी (दि.११) रात्री योगेशभाई नावाच्या साथीदारास सोबत घेवून त्यांनी शहरातील एजन्सीधारकांकडून पैशांची वसूली केली. नाशिकरोड येथे सुमारे १६ लाख ६१ हजार ७५० रूपयांची रोकड डिक्कीत ठेवून ते अॅक्टीव्हा एमएच १५ सीएच ६००१ दुचाकीने घराकडे परतत असतांना ही लुटमार झाली. नाशिक पुणेरोडने दोघे प्रवास करीत असतांना पाठीमागून दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या तरूणांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत पटेल यांनी आपले वाहन दामटले. नासर्डी पुलाजवळील समाज कल्याण कार्यालयासमोर भरधाव आलेल्या भामट्यांनी पटेल यांच्या दुचाकीस धडक दिली.
यावेळी पटेल यांच्यासह त्यांचा साथीदार रस्त्यावर पडले असता संशयितांपैकी एकाने डिक्कीतील रोकडसह दुचाकी घेवून इस्कॉन मंदिराच्या दिशेने पोबारा केला. या दुचाकीच्या डिक्कीत १६ लाख ३१ हजार ७५० रूपयांची रोकड होती पाळत ठेवून ही लुटमार झाल्याचे बोलले जात असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जीतू वाघ करीत आहेत.