नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात एका हॉटेलसह वेगवेगळया भागातील दोन घरे चोरट्यांनी फोडले. या घरफोडीमंध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा पाच लाखाच्या मुद्देमालावर डल्ला मारला असून याप्रकरणी म्हसरूळ,आडगाव व मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना पेठरोड भागात घडली. या भागातील हॉटेल फोडून चोरट्यांनी गल्यातील रोकडसह दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. याबाबत कैलास उत्तमराव चव्हाण (रा.बुधवारपेठ) यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण यांचे पेठरोडवरील पवार लॉन्स भागात न्यु उत्तम हिरा (घुंगरू) नावाचे रेस्टॉरंट आणि परमिट रूम नावाचा बिअर बार आहे. सोमवारी (दि.१०) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद बिअरबारच्या छतावरील कौले तोडून ही चोरी केली. हॉटेल मध्ये शिरलेल्या चोरट्यानी गल्यातील ३२ हजार ५०० रूपयाच्या रोकडसह महागड्या दारूच्या बाटल्या असा सुमारे ६९ हजार १२० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरी घटना आडगाव शिवारात घडली. युवराज वामन गडाख यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गडाख कुटुंबिय ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ४४ हजाराची रोकड व सोन्याचांदीची अलंकार असा सुमारे ३ लाख ६४ हजार ५२० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.
तिसरी घटना भाभानगर येथे घडली अशोक शंकर कु-हे (रा.भाभानगर गार्डनजवळ ) यांनी फिर्याद दिली आहे. कु-हे कुटुंबिय ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यानी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९८ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.