नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : औद्योगीक वसाहतीत मोबाईल हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. रस्त्याने पायी चालतांना फोनवर बोलत चालणे अनेकांना महागात पडत असून दुचाकीस्वार मोबाईल हिसकावून नेत आहेत. रविवारी (दि.९) एका सुरक्षारक्षकासह अन्य एका कामगाराचा मोबाईल भामट्यांनी पळविला असून याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश राधे अरकरा (रा.समर्थनगर,कॉलेजरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अरकरा रविवारी सायंकाळी आपली सेवा बजावून घराकडे रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली, औद्योगीक वसाहतीतील कामगार नगर भागातून ते पायी जात असतांना वाटेत त्यांना फोन आल्याने ते मोबाईलवर बोलत जात असतांना दुचाकीस्वारांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून नेले.
दुसरी घटना एबीबी कंपनी परिसरात घडली. अनिल कुमार हा परप्रांतीय कामगार एबीबी कंपनी परिसरातून मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना भामट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास हवालदार खरपडे करीत आहेत.
वृध्देच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अॅटोरिक्षातून उतरून घराकडे पायी जाणा-या वृध्देच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना मानेक्षानगर भागात घडली. या घटनेत भामट्यांनी सुमारे सव्वा लाख रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री रजनीकांत पाराशरे (७० रा.टाकळीरोड द्वारका ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाराशरे या रविवारी (दि.९) बाहेरगावी गेल्या होत्या. रात्री सव्वा आठच्या सुमारास त्या रिक्षातून प्रवास करून काठेगल्ली सिग्नल भागात उतरल्या मानेक्षानगर भागातून त्या रस्त्याने आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. पल्सरवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे अडिच तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार करीत आहेत.