नाशिक : सराईतच्या टोळीने शनिवारी (दि.८) रात्री वेगवेगळया ठिकाणी धुमाकूळ घालत दहशत माजविली. एका घटनेत तरूणास मारहाण करीत या टोळीने रोकडसह सोनसाखळीवर डल्ला मारला. तर दुस-या ठिकाणी मद्याच्या नशेत पतीस मारहाण करीत पिस्तूलचा धाक दाखवित महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी आडगाव आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून आडगाव पोलीसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना बळी मंदिर परिसरातील राणी व्हिला भागात घडली. याबाबत पंकज चंद्रकांत रकिबे (३७, रा. पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. रकिबे शनिवारी ( दि. ८ ) रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान बळीमंदीर येथे राहणा-या सतनाम राजपूत यांच्या पाळीव श्वानाला जेवण देण्यासाठी गेले होते. याठिकाणी संशयित हर्षद सुनील पाटणकर, (२५, रा. बेथेलनगर, शरणपूर रोड) सुमित बगाटे आणि त्याचे दहा ते अकरा साथीदार हे सतनाम राजपूत यांच्या घरावर दगडफेक करीत होते. दगडफेकीमुळे घराच्या काचा फुटल्याने याबाबत रकिबे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता सतनाम याने खूप पैसा जमविला आहे. त्याला सही सलामत राहायचे असेल तर पाच लाख रुपये द्यायला सांग. असे म्हणत पाटणकर व त्याच्या साथादीरांनी रकिबे यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील सुमारे ४१ हजार ३०० रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. या घटनेत संशयित सुमित बगाटे याने खिशातील तेराशे रुपये बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी लूट आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पाटणकर याच्यासह एका अल्पवयीन संशयितास आडगाव पोलीसांनी अटक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोन्डे करीत आहेत.
या घटनेनंतर संशयितानी आपला मोर्चा शरणपूर येथील बेथेलनगर भागात वळविला. परिसरातील महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित हर्षद पाटणकर याने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित वेदांत चाळगे, राहुल पवार व अन्य साथीदारांसह महिलेच्या घरासमोर आरडाओरड करीत रस्त्यावर बियरची बाटली फोडली. याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयित टोळक्याने पतीस लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी महिला आपल्या पतीच्या बचावासाठी धावून गेली असता संशयितांनी तिलाही शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी पाटणकर याने महिलेच्या गळयातील सोनसाखळी बळजबरीने हिसकावून घेत कमरेचा पिस्तूल काढून पोलीसात गेला तर जीवे ठार मारेल अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. करीत विनयभंग केला. यावेळी पाटणकर याने महिलेच्या गळयातील सोनसाखळी बळजबरीने हिसकावून घेत पिस्तीलचा धाक दाखवित जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लूट, दरोडा, विनयभंग, जीवे ठार मारण्याची धमकी आणि आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुनिल चव्हाण करीत आहेत.