नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातवेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडीमध्ये चोरट्यांनी सुमारे १८ लाखाचा ऐवजावर डल्ला मारला. त्यात वासननगर व चेतनानगर येथे भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीचा समावेश आहे. याबाबत इदिरानगर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.९) दुपारच्या समारास चेतनानगर व वासननगर भागात भरदिवसा दोन घरफोड्या झाल्या. याबाबत गोविंद पंडीत कोपरे (रा.महालक्ष्मी रो हाऊस,वासननगर) यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरे कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली दहा लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १६ लाख १ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
दुसरी घटना चेतनानगर येथील कशिष हॉटेल मागे घडली. योगेश नागराज सोनगिरे (रा.ओमकार अपा.) यांनी पोलीसात धाव घेतली आहे. सोनगिरे कुटुंबिय रविवारी घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी बंद घरफोडून सात हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६१ हजाराचा ऐवज चोरून नेला. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे १६ लाख ६२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनार करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील स्वामी विवेकानंद चौकात घडली. याबाबत संतोष शंकर ठाकुर (रा.ठाकरे सभागृहाजवळ,सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. ठाकुर कुटुंबिय शनिवारी (दि.८) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेली २५ हजाराची रोकड ,सोन्याचांदीचे दागिणे व दोन मनगटी घड्याळ तसेच टीव्ही असा सुमारे १ लाख ४० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रौदळे करीत आहेत.