नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भगूर येथे सासूने काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चुलत सास-यासह दिराने विवाहीतेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चुलत सासू असलेल्या महिलेसह बापलेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भगूर येथील पीडित विवाहीता आपल्या घरात अंघोळ करीत असतांना चुलत सासूने तिचे नकळत अश्लिल फोटो काढले होते. या फोटोचा वापर करीत सदर महिलेच्या मुलाने म्हणजे पीडितेच्या चुलत दिराने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. यानंतरही संशयिताने सदरचे फोटो पती व नातेवाईकांना दाखविण्याबरोबरच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी ठिकठिकाणी घेवून जात बलात्कार केला.
गेल्या तीन वर्षापासून महिला दिराचा अत्याचार सहन करीत असतांनाच काही दिवसापूर्वी चुलत सास-याने याच प्रकारे ब्लॅकमेल करीत नाशिकरोड येथील एका लॉजवर घेवून जात महिलेवर बलात्कार केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.