नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वृध्दाचे दागिणे लांबविले. ही घटना अशोकामार्गावरील कल्पतरूनगर भागात घडली असून यात अंगठी व सोनसाखळी असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवच तोतयांनी पळविला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक लक्ष्मण गायकवाड (७५ रा.लेन.नं.१ कल्पतरूनगर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गायकवाड गेल्या मंगळवारी (दि.४) सायंकाळी आपल्या घर परिसरातून फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. टाकविला व लक्ष्म बंगल्यासमोरून ते पायी जात असतांना वेगवेगळ्या दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांना गाठले. पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी त्यांना या भागात मोठ्या प्रमाणात चो-या होत असून अंगावरील दागिणे सुरक्षीत काढून ठेवण्याचा सल्ला दिला.
यावेळी गायकवाड यांना मदतीचा हात देत संशयितांनी सोनसाखळी,अंगठी व घड्याळ रूमालात बांधून देण्याचा बहाणा करून १ लाख १४ हजार रूपये किमतीचे अलंकार घेवून पोबारा केला. ही बाब गायकवाड घरी परतल्यानंतर उघडकीस आली. अधिक तपास हवालदार शिदे करीत आहेत.