नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी सराईताने एका भाजीपाला व्यापा-याकडे पाच लाख रूपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरासमोर येवून संशयिताने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने व्यावसायीकाने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर जाधव (रा.राहूलवाडी समोर,फुलेनगर) व त्याचा एक साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सराईतांची नावे आहेत. याबाबत सागर सुधाकर पगारे (रा.फुलेनगर पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पगारे भाजीपाला व्यापारी असून ते दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात व्यवसाय करतात. बुधवारी (दि.५) पगारे आपला व्यवसाय सांभाळत असतांना संशयित सागर जाधव या सराईताने त्यांची भेट घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वर्गणी व्यतिरिक्त डेकोरेशनसाठी पाच लाख रूपये द्यावेत अशी त्याने मागणी केली होती. याबाबत पगारे यांनी पोलीसात शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्याने ही घटना घडली.
शुक्रवारी (दि.७) सकाळी संशयित जाधव याने अन्य एका साथीदारास सोबत घेवून पगारे यांचे घर गाठले. यावेळी तू कप्लेट मागे घे नाहीत किरण निकमचा जसा खून केला तसे तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. यावेळी अन्य साथीदारानेही मार्केट मध्ये पाय ठेवू देणार नाही अशी धमकी दिल्याने भेदरलेल्या पगारे यांनी पुन्हा पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत.
…………