नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात वावर ठेवणा-या तीन तडिपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई गुरूवारी (दि.६) वेगवेगळया भागात करण्यात आली असून, याप्रकरणी उपनगर, अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने पोलीसांकडून केली जाणारी हद्दपारीची कारवाई कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
साहिल राजू महाकाली उर्फ पोश्या (२४ रा.सुंदरनगर रोकडोबावाडी), रवी गजानन गवई (२६ रा.घरकुल योजना,चुंचाळे शिवार) व किरण उर्फ बिट्या रमेश मल्हार (२५ रा.म्हाडा वसाहत,वडाळागाव) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपार गुंडाची नावे आहेत. संशयितांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहर व जिह्यातून तिघांना वेगवेगळया कालावधीसाठी हद्दपार केलेले असतांनाही ते शहरात मिळून आले.
पोश्या महाकाली हा गुंड गुरूवारी रात्री रोकडोबावाडी येथील वालदेवी नदीच्या पुलावर मिळून आला. याबाबत अंमलदार सुरज गवळी यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बरेलिकर करीत आहेत. रवि गवई हा गुंड २० जानेवारी रोजी चुचाळे शिवारातील घरकुल योजना येथील बिल्डींग नं. ७ मध्ये आढळून आला होता.
याबाबत उपनिरीक्षक संदिप शेवाळे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. तर किरण मल्हार हा सराईत गुरूवारी सायंकाळी वडाळागावातील म्हाडा वसाहतीत मिळून आला. याबाब अंमलदार योगेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मानकर करीत आहेत.