नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेअर खरेदी विक्रीतील गुंतवणुक एकास चांगलीच महागात पडली आहे. सायबर भामट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या इसमास तब्बल ६५ लाखास गंडा घालण्यात आला असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गुंतवणुकदाराशी गेल्या डिसेंबर महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. शेअर मार्केटची माहिती देत संशयितांनी वेगवेगळया नावाच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये तक्रारदारचा समावेश केला. या ग्रुपमधील सदस्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याच्या संदेशाला भूलून ही फसवणुक झाली. सायबर भामट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या तक्रारदारानेही काही रकमा संशयितांच्या सांगण्यानुसार अन्य बँक खात्यात वर्ग केल्या. त्यानंतर भामट्यांनी नामांकित कंपनीचे नाव वापरून बनावट इन्व्हेस्टमेंट अॅपमध्ये तक्रारदाराच्या नावाने वेगवेगळया कंपनीचे शेअर्स खरेदी करीत असल्याचे भासविले. त्यामुळे तक्रारदार यांचा विश्वास बसला. या घटनेत तक्रारदारास ५२ लाख २२ हजार २४७ रूपये भरण्यास भाग पाडण्यात आले.
कालांतराने गुंतवणुकीत मोठी रक्कम जमल्याने तक्रारदाराने ती विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅपीटल गेन टॅक्स म्हणून पुन्हा १२ लाख ५४ हजार १४७ रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले. मात्र त्यानतरही गुतवणुकीसह नफ्याची रक्कम अदा न झाल्याने तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली असून या घटनेत तक्रारदाराची ६४ लाख ७६ हजार ३८४ रूपयांची फसवणुक झाली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.